बारामती : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे देखील मागील २ वर्षे पूर्णपणे सोडून दिलं आहे, अशी खोचक प्रतिक्रिया एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘अण्णा हजारे यांच्याविषयी काही पाहणे आणि बोलायचे नाही असं मी मागील २ ते ३ वर्षांपूर्वीच ठरवले आहे. त्यांच्याबद्दल कुठलीही बातमी छापून आली तरी सुद्धा मी ते वाचत नाही,’ असा खोचक टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधानांसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. देशाच्या संसदेत आजवर लोकसभेच्या अखेरच्या सत्रातील अनेक पंतप्रधानांचे भाषणे मी पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील गुरुवारचे भाषण वाचनात आले. त्यानुसार त्यांचे भाषण देशाच्या संसदेतील प्रथेला धरून नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते पुन्हा बोलले आहेत,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.
