मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय योग्य नव्हता असं म्हटलं आहे. केवळ पुतळे उभारुन देशभरात वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हीच गोष्ट जर गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर काय गोंधळ झाला असता, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. शिवाय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय बेफिकीरपणे उत्तरं देतात. आणि ते वनमंत्री आहेत म्हणजे त्यांनी सर्वच समजतं असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे उद्या त्यांचं वनमंत्रिपद सुद्धा जाऊ शकतं, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, ज्या वाघिणीला यवतमाळ येथे ठार करण्यात आले आहे, तेथे सरकार अनिल अंबानींना जमीन देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अनिल अंबानींसाठी संपूर्ण देश विकायला काढला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सुद्धा मनसे अध्यक्षांनी केला आहे.

विशेष म्हणजे अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर तिचे २ बछडे सुद्धा अनाथ झाले आहेत. एका जिवाला ठार केल्यानंतर आणखी २ जिवांना सरकारने मारल्याचं चित्र आहे. या सरकारला एकूणच सत्तेचा माज आला आहे. आणि आम्ही काही सुद्धा केलं तरी सगळं सहन केलं जाते, अशी त्यांची मानसिकता तयार झाली आहे. पण आता घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे सरकारला लवकरच कळेल आणि जनताच त्यांना धडा शिकवेल असं राज ठाकरे म्हणाले.

MNS chief raj thackeray criticised bjp over killing avni tigerees at yavatmal