मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक काल संध्याकाळी सौराष्ट्र पटेल समाज हॉल जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या पूर्व नियोजित बैठकीला सुरुवात होताच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु झाली, त्यांचा उमेदवारीसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून दिवंगत केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेश शेट्टी यांच्या उमेदवारीची मागणी उचलून धरली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
दरम्यान हा मतदासंघ राज्याचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचे कार्यक्षेत्र असल्याने, तसेच त्यांची राजकीय प्रतिमा स्वच्छ असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी उचलून धरली आणि जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सदर मतदारसंघ हा आधी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गुरुदास कामत यांचा मतदारसंघ होता आणि त्यांचे संजय निरुपम यांच्यासोबत विळा भोपळ्यासारखे राजकीय संबध होते. परिणामी हे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
तसेच काँग्रेसच्या काळात सुरेश शेट्टी हे राज्याचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी राजीव गांधी आरोग्य योजना आणि १०८ ही आरोग्यविषयक योजना अमलात आणली गेली होती आणि यशस्वी सुद्धा झाली होती. जनसामान्यांना त्या योजनेचा प्रचंड फायदा झाला होता. आज भाजपने त्याच योजनेचे केवळ नामांतर करून राज्यभर गवगवा सुरु केला आहे. त्यामुळे सुरेश शेट्टी यांनाच या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच संजय निरुपम यांचा मूळ मतदारसंघ असलेल्या लोकसभा क्षेत्रात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा आलेख सध्या ढासळला असल्याने संजय निरुपम यांनी त्याच मतदार संघातून लोकसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु आहे. त्यामुळे पुढे काँग्रेसचे वरिष्ठ काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
VIDEO: कसा विरोध झाला नेमका कालच्या बैठकीत?
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		