मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने त्यांच्या राजकीय अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या पत्नी आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या सत्तेचा गैरवापर करत दुधवडकर दाम्पत्याकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय दुबे यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. संजय दुबे यांनी त्यांच्या अनधिकृत बांधकामाविषयीची लेखी तक्रार महापालिकेत केली होती. परंतु, या दाम्पत्याकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. अखेर, संजय दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून दुधवडकर दाम्पत्याला न्यायालयीन धक्का देण्याची तयारी केली आहे.
दुधवडकर दाम्पत्याचं ताडदेव येथे दीपक अपार्टमेंट सुपारीवाला इमारतीत घर आहे. ताडदेव टॉवरजवळील व्हॅलेंटाईन स्पोर्ट्स क्लबला लागूनच एक वाढीव बांधकाम केलं आहे आणि त्यासाठी कोणतीत कारदेशीर परवानगी नसून पूर्णपणे अनधिकृत असल्याचा दावा संजय दुबे यांनी केला आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		