मुंबई : दोन दिवसांपूर्वी अवनी या टी-१ वाघिणीला महाराष्ट्र वन खात्याने विशेष मोहीम राबवून ठार केल्यानंतर संपूर्ण देशात टीकेचा सूर उमटला आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. आता शिवसेनेने सुद्धा अवनीवरून भाजप आणि वनखात्याविरोधात विरोधात आवाज उठवला आहे. ‘ज्या महाराष्ट्रात माणसं सुद्धा नीट जगू शकत नाहीत, त्याच राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? पण अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात उंदरांना सुद्धा वाघाचे बळ येते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपवर आणि वन खात्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यात ‘दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे महाराष्ट्रात माणसं मरत आहेत, नाहीतर स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. परंतु, त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. परंतु, वन्य प्राण्यांना थेट ‘नरभक्षक’ ठरवून शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस’, असा टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे सामनामध्ये?

  • हिंदुस्थानच्या जंगलातून वाघ कमी होत आहेत व ‘वाघ बचाव’ आंदोलन सर्वच पातळ्यांवर सुरू असताना अवनीस ठार केले गेले. कश्मीरात पाक घुसखोरांना मोकाट सोडणाऱ्यांनी काळोखात दबा धरून अवनीस गोळ्या घातल्या. म्हणजे खरे वाघ मारायचे आणि नंतर खोटे वाघ घेऊन फिरायचे.
  • अवनी वाघिणीला गोळ्या घालण्यासाठी हैदराबादहून खास एका एन्काऊंटर स्पेशालिस्टला पांढरकवड्यास बोलावण्यात आले होते. म्हणजे मुंबईतील गुंडांचे जसे एन्काऊंटर मधल्या काळात होत असे व अनेक ‘चकमक’फेम अधिकारी नंतर वादाच्या भोवऱ्यात सापडत तसे आता अवनीच्या चकमकीचे झाले आहे. पुन्हा एवढ्या काळोखात, धावपळीत त्या ‘शूटर’ने बरोबर अवनीच्या वर्मी गोळी कशी मारली हा प्रश्नही उरतोच.
  • अवनीने म्हणे १३ माणसे खाल्ली म्हणून तिला जिवंतपणी गोळ्या घातल्या, पण महाराष्ट्रात विविध स्तरांवर नरभक्षण सुरूच आहे. ज्या पांढरकवड्यात अवनीस मारले, म्हणजे १३ जणांच्या मृत्यूचा ठपका ठेवून मृत्युदंड दिला त्याच यवतमाळ-पांढरकवडा परिसरात सरकारी नादानीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या. कीटकनाशकांमुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे बळी यवतमाळमध्ये गेले. त्यातील गुन्हेगारांना कोणी अवनीप्रमाणे कठोर शिक्षा दिल्याचे दिसले नाही.

shivsena chief uddhav thackeray slams bjp over tigress avni shot dead case in maharashtra