औरंगाबाद : सध्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे औरंगाबाद शिवसेना नेत्यांमधील राजकारण चव्हाट्यावर येत आहे. सेनेचे कन्नड मधील आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कालच शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केलं होत की ‘उध्दव ठाकरे माझा नाही तर हर्षवर्धन जाधव यांचाच निर्णय घेतील’ असे म्हणत हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती. तर आज त्यालाच प्रतिउत्तर म्हून हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “माझ्या वडीलांच्या गौरव ग्रंथ प्रकाशनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कन्नडला आले आणि तेव्हाच माझा निर्णय झाला होता. उद्धव ठाकरे साहेबांनी कन्नडला येऊ नये यासाठी चंद्र्कांत खैरे यांनी अनेक कारणे उद्धव ठाकरे यांना सांगितली. उद्धव ठाकरे साहेबांची दिशाभूल करण्यासाठी खैरेंनी शर्थीचे प्रयत्नं केले होते. खैरे उद्धव ठाकरे साहेबांना सांगायचे साहेब गर्दी जमणार नाही, लोक येणार नाहीत.
परंतु पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांनी चंद्रकांत खैरे यांचा विरोध झुगारून कन्नड येथील कार्यक्रमाला हजेरी लावली आणि माझा निर्णय खऱ्या अर्थाने त्याच दिवशी झाला,” आता काय निर्णय व्हायचा व्हायचाय तो खासदार चंद्रकांत खैरे यांचाच होईल असा टोला सुद्धा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लगावला.
एकूणच सध्या आमदार हर्षवर्धन जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलंच युद्ध पेटलं आहे अशी चर्चा औरंगाबादच्या राजकीय आखाड्यात सुरु आहे. कन्नड मधील पत्रकार परिषदेत तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी धक्कादायक वक्तव्य केलं की, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून यावेळी नवा चेहरा द्या ज्यामुळे शिवसनेच्या औरंगाबादमधील राजकारणात खळबळ उडाली होती. आमदार हर्षवर्धन जाधव यांचा थेट औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीलाच उघड विरोध असल्याचे कळते.
त्यामुळे येत्या काळात शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे वाद उफाळून येऊ शकतो आणि त्याचे परिणाम थेट निवडणुकीवर होऊ शकतात असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
