मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहत अत्यंत दुःख व्यक्त केले. त्यात त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, जॉर्ज फर्नांडिस यांचा स्वतःचा असा एक कालखंड होता. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या काळात तळपत राहिले. परंतु हा तळपणारा तारा आता निखळला. तसेच आता राजकीय क्षितिजावरील एक धगधगती मशाल सुद्धा विझली आहे. इतिहासाच्या पानावर जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव कुणाला पुसता येणार नाही, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे.
परंतु, जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांना अर्थवादात ओढले आणि कामगार चळवळीचे प्रचंड नुकसान झाले, अशी टीका सुद्धा त्यानंतर करण्यात आली आहे. मुंबई ही राज्याची राजधानी. परंतु, त्यापेक्षा देशाची आर्थिक राजधानी होती, त्यामुळे भर पावसाळ्यात महापालिका कामगारांना संपात ढकलून ‘मागण्या’ मान्य करायच्या किंवा करून घ्यायच्या हे धोरण जॉर्ज यांनी नेहमीच राबवले, असं सुद्धा मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे दुःख आणि टीका अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख आजच्या अग्रलेखातून जॉर्ज फर्नाडिस यांच्या बाबतीत करण्यात आला आहे.
