जयपूर : राजस्थानमध्ये लवकरच म्हणजे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक सर्व्हे मध्ये राजस्थानमध्ये भाजपच विद्यमान सरकार कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या राजस्थानमधील वातावरण भाजप विरोधी आणि काँग्रेससाठी अनुकूल असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.
त्यामुळेच सावध झालेल्या वसुंधरा राजे सरकारने आमिषाचं गाजर बाहेर काढलं आहे. वसुंधरा राजे सरकारने गरीब महिलांना स्मार्ट मोबाइल देण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जयपूरमध्ये मुख्यमंत्री लाभार्थी संवाद कार्यक्रमात ‘भामाशाह डिजिटल परिवार योजने’ची घोषणा केली. त्यामुळे भाजप २०१४ प्रमाणे निवडणूका जिंकण्यासाठी पुन्हा सामान्य लोकांना अमिष दाखवत असल्याची चर्चा राजस्थानात रंगली आहे.
राजस्थान मध्ये सध्या निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार असल्याने त्याला सामान्य लोकं बळी पडतात कि वसुंधरा राजे सरकारला उलथून लावतात ते २-३ महिन्यात स्पष्ट होणार आहे. काल वसुंधरा राजे यांनी एक कोटी कुटुंबाना ‘भामाशाह’ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील महिलांना स्मार्ट मोबाइल फोन देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. स्मार्ट मोबाइल फोनच्या माध्यमातून या महिलांना सरकारच्या आर्थिक आणि इतर योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. इंटरनेट सेवा युक्त स्मार्टफोनच्या खरेदीसाठी सरकारकडून दोन टप्प्यात हजार रुपये देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात पाचशे रुपयांतून हँडसेट खरेदी केल्यानंतर इंटरनेट कनेक्शन सुरू करण्यासाठी पुढील पाचशे रुपये देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सांगितले.
