23 October 2019 11:26 AM
अँप डाउनलोड

येवले चहावरील कारवाई; मनसे मराठी उद्योजकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी

yeola tea, Avinash Jadhav, Vasant More

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाच्या चहा पावडर आणि चहा मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. येवलेंच्या चहा पावडर, टी-मसाला आणि साखरेच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे माहितीपर लेबल नसल्याचे आढळले. तसेच, अन्य काही त्रुटीही आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असून, सहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.

‘येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही. येवले चहासाठी मिनरल वॉटरचा वापर करण्यात येतो,’ अशा प्रकारची दिशाभूल करणारी जाहिरात येवले चहाकडून करण्यात आली. कायद्यांतर्गत तरतुदीचे उल्लंघन करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल येवले चहा कंपनीला सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी नोटीस बजावली होती.

त्यानुसार शहरातील येवले चहा विक्री केंद्राच्या कोंढव्यातील उत्पादन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) मंगळवारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्या केंद्रातून शहरातील येवले चहाच्या हॉटेलमध्ये पुरविण्यात येणारी चहा पावडर, तसेच चहा मसाल्याचे उत्पादन थांबविण्याचे आदेश देण्यात आले. अन्न व सुरक्षा मानके कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले होते.

“आरोग्यासाठी हानिकारक असलेला ‘मेलानाईट’ नामक पदार्थ आमच्या चहामध्ये आढळला असे म्हटले जात आहे. परंतु या विधानांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. एफडीएचे अधिकारी जेव्हा आमच्या हॉटेलमध्ये तपास करण्यासाठी आले तेव्हा आमच्या पॅकिंगमध्ये त्यांना काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आमच्यावर कारवाई केली” असा दावा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नवनाथ येवले यांनी केला होता.

दरम्यान, शहरांमध्ये अनेक ठिकाणी उघडयावर आणि अत्यंत निकृष्ठ दर्जाचे खाद्य पदार्थ विकले जातात. मात्र त्यावर सरकारची नजर अजिबात जात नाही आणि त्यावरून समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली होती. तसेच येवले चहा वरील कारवाई म्हणजे मराठी उद्योजकांची गळचेपी असल्याचा आरोप मराठी तरुणांनी केला होता. मात्र त्यावर केवळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा मनसेच्या पुणे आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी थेट येवले चहाचा आनंद लुटत मराठी उद्योजकांच्या पाठीशी ठाम पणे उभं राहण्याचा आवाहन मराठी लोकांना केलं.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(454)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या