ऊन जास्त तापू लागले की असं होतं,
घामाची धार लागून मन तहानलेलं होतं..
बर्फाशिवाय मग काहीच लागत नाही,
चहा कॉफीपेक्षा लिंबू सरबत बरं वाटतं..
गरम-गरम वरण भात नकोसा वाटतो,
दहीभात दोन टाईम हल्ली पुरत असतो..
लाहीलाही होऊन देह दुपारी गारवा मागतो,
डोक्यावर तीन पात्याचा पंखा गरगरत राहतो..
उन्हात आल्हाद शोधत फिरणं होत असतं,
नेमकं ज्यूस आइस्क्रीम पार्लर बंद सापडत..
वडापाव भजीचा तेलकटपणा चीटकुन बसतो,
अन् कपाळावरची घामाची थेंब मी टिपून घेतो..
देहाला सावली हवी अन् काळजाला थंडावा,
पण पावलं शोधत राहतात मातीतला ओलावा..
उन्हाळा येतो अन् सावलीलाही जाळत जातो,
बर्फाच्छदित प्रदेशातले टूर महाग करत जातो..
झाडं सुकून जातात अन् पाचोळा गोळा होतो,
करपलेला देह पुन्हा आगीत होरपळत जातो..
सांजेला उनाड वारा बेपत्ता झालेला असतो,
रोजची चिडचिड रात्री दही खिचडीत पचवतो..
हा उन्हाळा आतल्याआत धगधगत राहतो,
रात्री केव्हातरी गारवा हळूच स्पर्शून जातो..!
लेखक: पियुष खांडेकर
