नवी मुंबई : लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचंड मेहनत करायची आहे. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा धक्कादायक सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या जाहीर सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्यानंतर एनसीपीने सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना मंदा म्हात्रे यांचा तोल गेला. मात्र, चूक लक्षात येताच २ ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला यापूर्वी एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दिला होता, अशी पुष्टी जोडत त्यांनी स्वतःच्या तोंडून केलेल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
Navi Mumbai: Case registered against BJP MLA from Belapur, Manda Mhatre, for violating model code of conduct, for allegedly asking voters at a programme to vote twice in #LokSabhaElections2019 . #Maharashtra
— ANI (@ANI) April 15, 2019
