धुळे : धुळे शहरातील राजकीय वातावरण सध्या आमदार अनिल गोटेंच्या भाजप विरोधातील बंडामुळे तापलं आहे. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्यांच्या या आक्रमक शैलीचे पडसाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सुद्धा सर्वांना पाहायला मिळाले. त्यामुळेच आमदार गोटे यांच्या रविवारी रात्री झालेल्या सभेकडे संपूर्ण धुळे शहराचं लक्ष होतं.

शहरातील साक्री रोडवरील शिवतीर्थालगत सायंकाळी ७ च्या सुमाराला भाजपच्याच नावाने त्यांची सभा पार पडली. दरम्यान, यावेळी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, तेजस गोटे, भीमसिंग राजपूत, सुनील नेरकर, निलम वोरा, दिलीप साळुंखे, प्रमोद मोराणकर यांच्यासह अनिल गोटे यांचे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही वेळाने गोटे यांनी भाषण सुरू केले. त्यादरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच विरोधकांवरही सुद्धा तोंडसुख घेतल्याचे पाहायला मिळाले.

तसेच त्यांच्या तब्बल दीड तासाच्या भाषणात आमदार गोटे यांनी विरोधकांवर टीका आणि धुळे शहर विकासावरच अधिक वेळ खर्ची घातला, त्यामुळे उपस्थितांमध्ये सुद्धा ते नेमकी कोणती महत्वाची घोषणा करणार याची उत्कंठा होती. अखेर भाषणाच्या अगदी शेवटी पुढचा महापौर आमदार अनिल गोटे असे जाहीर केले. आणि ही घोषणा तुम्हाला मंजूर, लॉक किया जाए…असे म्हणताच त्यांना जोरदार घोषणांनी समर्थन देण्यात आले.

bjp dhule mla anil gote will contest mayors election