मंडणगड : दापोली, मंडणगड आणि खेड तिनही तालुक्यात पाणीप्रश्न, रस्ते आणि बेरोजगारीसोबतच इतर अनेक मोठ्या समस्या स्थानिकांना भेडसावत असताना असताना केवळ ब्लँकेट, छत्री आणि फराळ वाटून मतदारांना आमिष आणि भुलवण्याचे काम राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम करत असल्याची खरमरीत टीका एनसीपीचे आमदार संजय कदम यांनी केली.
काल आंबवणे खुर्द बौद्धवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन एनसीपीचे स्थानिक विद्यमान आमदार संजय कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केले आणि रामदास कदमांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, पुढे ते असं सुद्धा म्हणाले की ‘मागील ३० वर्षात या मतदार संघातील शिवसेनेच्या खासदार निधीतून मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला १० टक्के निधी तालुक्यात किती मागासवर्गीय वाड्यांमध्ये खर्च केला आहे? ते आधी पुराव्यानिशी दाखवून द्यावे, असे थेट आव्हान देत शिवसेनेला लक्ष केले.
दरम्यान आंबवणे खुर्द गावातील राजकीय स्थितीकडे जराही लक्ष न देता येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तांबे आणि ग्रामस्थांच्या इच्छेनुसार रस्त्याचे काम मी तातडीने मंजूर केले आणि कोणताही पक्षपात केला नाही. कारण रामदास कदम यांच्या प्रमाणे ब्लँकेट, छत्री आणि फराळ वाटून लोकांच्या खऱ्या गरजा पूर्ण होत नाहीत. कारण अनेक वर्षांपासून या गावागावांमध्ये मुलभूत सुविधांचीच उणीव आहे. कारण, पूर्वी ३ महिन्यांनी येणारे घरातील विजेचे बिल आता प्रत्येक महिन्याला येते. विशेष म्हणजे याच मतदार संघात पाणीप्रश्न, रस्ते, बेरोजगारी अशा एक ना अनेक गंभीर समस्या असताना केवळ स्वतःच्या मुलाच्या प्रचारासाठी ते भेटवस्तू देऊन मतदारांना मूर्ख बनवत आहेत.
