रत्नागिरी : भारतातील निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयू’चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
प्रशांत किशोर यांचा २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षासाठी आणि मोदींसाठी निवडणूक रणनीती आखण्यामध्ये प्रमुख सहभाग होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बिनसल्यावर त्यांनी संयुक्त जनता दलाचा आसरा घेतला. दरम्यान, कालच्या भेटीचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की,’… आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा, सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा.’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने शिवसेनेविरुद्ध रान पेटवले आहे. त्यात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील राजकीय हल्ले सुरूच ठेवले आहेत.
आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा… सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लाऊन फिरतील सुधा. pic.twitter.com/MYKvuM8wKa
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 6, 2019
