मुंबई: मुंबई महानगर पालिकेतील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांची याचिका जात पडताळणी समितीने अवैध ठरवत फेटाळली होती. या प्रकरणी नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असता, कोर्टानेदेखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. दरम्यान आज झालेल्या पालिका सभागृहात भाजपाच्या २ काँग्रेसच्या १ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द केल्याची अधिकृत घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला या ३ नगरसेवकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून यावर आता येत्या शुक्रवारी पुढील सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या २ आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असता, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव यांच्या याचिका दिनांक २ एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या.

पालिकेत निवडून आल्यावर एका वर्षात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र हे प्रमाणपत्र सादर न झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती. भाजपाचे नगरसेवक केशरबेन पटेल, मुरजी पटेल आणि काँग्रेस नगरसेवक राजपती यादव यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार होती. तर उच्च न्यायालयानेही तिघां नगरसेवकांच्या विरोधात निकाल दिल्यामुळे केशरबेन पटेल प्रभाग क्रमांक ७६, मुरजी पटेल प्रभाग क्रमांक ८१ व राजपती यादव प्रभाग क्रमांक २८ यांचे नगरसेवक पद रद्द केल्याची घोषणा आज महापौरांनी सभागृहात केली.

केशरबेन पटेल, मुरजी पटेल व राजपती यादव यांचे नगरसेवक पद अखेर रद्द