मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा नसला केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय पटलाच्या क्षितीजावरुन हटविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी राज ठाकरे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सभा घेत या दोघांनाही आणि त्यांच्यामुळे ज्यांना फायदा होईल अशांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. आता राज ठाकरे यांच्या मुंबईसह नाशकात सभा होणार आहेत.
या सभांना आजपासून प्रारंभ होत असून आज मंगळवार, २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदय नगर येथे राज ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा होणार आहे. तर बुधवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भांडुप (पश्चिम) येथील खडी मशिन, जनता मार्केट, जंगलमंगल रोड येथे, गुरुवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पनवेल येथील गणेश मैदान, खांदेश्वर स्टेशन जवळ, कामोठे येथे आणि शुक्रवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, सिव्हिल हॉस्पीटल समोर जाहीर सभा होणार आहेत. या सभांमधून पुन्हा एकदा राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर तोफ डागताना दिसणार असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह आहे.
