नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या ३ टप्प्यांतील मतदान झाले असून उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार कोण असतील याबाबत शक्यता वर्तविली आहे. ते म्हणाले, जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी राहिलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील. तसेच यात चौथ्या क्रमांकावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नावही त्यांनी घेतले. शनिवारी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक ठरते असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्याच धर्तीवर एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाचा अनुभव असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, असेही पवार म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती, ममता आणि नायडू हे पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य पर्याय आहेत, असे मी कधीही म्हणालो नाही, असेही पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

चंद्राबाबू, ममता किंवा मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार: शरद पवार