सोलापूर : माळशिरस विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. मागील ३-४ दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी इस्पितळात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्रीपासून त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती.

हनुमंतराव डोळस हे माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रहिवाशी होते. २००९ पासून माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्यापासून, डोळस या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते. त्यांच्या जाण्याने माळशिरसमध्ये शोककळा पसरली आहे आणि राष्ट्रवादीला देखील विधानसभा निवडणूक जवळ आलेल्या असताना जोरदार राजकीय धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचं दीर्घ आजाराने निधन