उमरेड : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांवर भाजपचे वर्चस्व असून देखील नगरसेवकांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उमरेड नागरपरिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक मनोज बावनगडे यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने तयारी सुरु केली असून, स्थानिक स्थरावर पक्षविस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकिची मतदान प्रक्रिया महाराष्ट्रापुरत्या संपताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणजे आज राज ठाकरे कल्याण – डोंबिवली विधानसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत.
तसेच यापूर्वी मनसेची सत्ता असलेल्या नाशिकमध्ये देखील भाजपच्या गोटात पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्याचं वृत्त आहे. मागील २-३ वर्षात भाजपने नाशिकमध्ये काहीच विकास न केल्याने स्थानिक जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. अर्थात त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. त्यात नाशिक भाजपचे अनेक गट स्वतः हवं त्याप्रमाणे कामं करत असल्याने सर्वच कठीण होऊन बसलं आहे आणि परिणामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिक भाजपमध्ये मोठी फूट पडणार असल्याचं वृत्त आहे. त्याचा सर्वाधिक फायदा हा भविष्यात मनसेला होईल अशी शक्यता अधिक आहे.
