मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ३ जागा सोडणार, आघाडीसोबत लोकसभा निवडणुका लढणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेली भूमिका आणि त्याचा उत्तर प्रदेश, मुंबईत होणारा परिणाम या कारणांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी तीव्र विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी निवडणुकच लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने यावर पडदा पडला होता. परंतु, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सभा घेतल्या होत्या. या सभा ‘लाव रे तो व्हिडिओ’ द्वारे गाजल्याही होत्या.
मात्र उत्तर प्रदेशात निकालाअंती तिथल्या मतदाराने काँग्रेस, सपा आणि बसपाच्या स्पष्ट नाकारल्याने, आज उगीच मनसे आणि राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांच्या विषयाचा बाऊ केल्याचे त्यांना वाटू लागले असावे. तसेच ना अल्पसंख्यांक, ना हिंदू, ना बौद्ध समाज सोबत राहिल्याने काँग्रेसला राज्यात मतदार उरलेला नाही असंच चित्र आहे. त्यात मनसेकडे मराठी मतदार आणि मोदी विरोधामुळे अल्पसंख्यांक देखील वर्ग होऊ शकतात, तसेच राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी लोकं तरी जमतील, मात्र राज्यातील नेत्यांना ऐकण्यासाठी देखील लोकं जमणार नाहीत आणि त्यामुळे मनसेशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही अशीच सध्याची गत झाली आहे.
दरम्यान काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न लोकसभेला सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेसकडून सुरु झाले आहेत. नुकत्याच झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत हा सूर आळवला गेला होता. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना मारक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. याचेच एक पाऊल म्हणून आजच्या माणिकराव ठाकरे यांच्या कृष्णकुंज भेटीकडे पाहिले जात आहे.
