मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जुन २०१९ रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत, तसेच याची अधिकृत माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलर वरून दिली आहे. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ नवनिर्वाचित खासदार देखील असतील. मात्र उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या आधीच केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी १ वादग्रस्त विधान केले आहे.
रामदास आठवले म्हणाले, राम मंदिराचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे उद्धव ठाकरे १० वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर काही होणार नाही. उद्धव ठाकरेंना दुसरा अयोध्या दौरा करण्याची काहीच गरज नाही कारण ते तिकडे जाऊन काहीच करू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे, त्यांना राम मंदिराची मागणी करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
कायदा हातात न घेता राम मंदिर बांधणे ही सरकारची भूमिका आहे आणि त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असून उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही, असा टोला आठवलेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
