पठाणकोट : जम्मू-काश्मीरमधील बहुचर्चित कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी पठाणकोट कोर्टाने प्रमुख आरोपी सांझी राम, तिलक दत्ता यांच्यासह ५ जणांना दोषी ठरवले आहे. तर, आरोपी विशाल याला दोषमुक्त करण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने आज आपला निकाल सुनावला. २ वाजता सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता, या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
३ जून रोजी या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी झाली. त्यावेळी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तेजविंदरसिंग यांनी दहा जून रोजी निकाल देऊ, असे सांगितले होते. सदर घटनेवर केवळ देशात नव्हे संपूर्ण जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
