नवी मुंबई : नवी मुंबई आणि ठाणे या भागातील राष्ट्रवादीचा चेहरा असलेले माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्यास असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नाईक हे राष्ट्रवादीच्या ५७ नगरसेवकांसह येत्या काही दिवसांत प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी एनसीपीच्या ५७ नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत नाईक यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील एनसीपीच्या काही सदस्यांनी रविवारी गणेश नाईक यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करा, अशी मागणी केली. त्यानंतर घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारास ४०,००० मतांनी पिछाडीवर राहावे लागले. ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही आनंद परांजपे हे ४५, ००० मतांनी मागे होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. आता गणेश नाईक काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संदीप नाईक यांची सावध प्रतिक्रिया;
एनसीपीच्या स्थानिक नगरसेवकांत प्रचंड अस्वस्थता आहे. पक्षांतराबाबत दबाव वाढत आहे. मात्र गणेश नाईक यांनी यासंदर्भातील आपली भूमिका यापूर्वीच जाहिर केली आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. असे असले तरी नाराज नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी आपण प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत. तोपर्यंत कोणत्याही शक्यतेवर भाष्य करणे उचित होणार नाही, असे आमदार संदीप नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादीचं राजकारण संपुष्टात येणार, गणेश नाईक भाजपच्या वाटेवर?