पोर्ट ऑफ स्पेन: कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार ५९ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार ५९ धावांनी मात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७९ धावांपर्यंत मजल मारली. मात्र विंडीजच्या फलंदाजीदरम्यान सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे, यजमान संघाला विजयासाठी ४६ षटकात २७० धावांचं लक्ष्य देण्यात आलं. विंडीजचा संघ २१० धावांपर्यंत मजल मारु शकला. एविन लुईसचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. निकोलस पूरनने लुईसला चांगली साथ दिली मात्र त्यांची झुंज अपूरची पडली.

विंडीजच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात आश्वासक पद्धतीने केली होती. पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाल्यानंतर भुवनेश्वरने ख्रिस गेलला माघारी धाडलं. यानंतर शाई होप, शेमरॉन हेटमायरही झटपट माघारी परतले. यानंतर निकोलस पूरन आणि लुईस यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. अखेरीस कुलदीपने एविन लुईसला माघारी धाडत विंडीजची जमलेली जोडी फोडली. त्याने ६५ धावा केल्या.

भुवनेश्वरने पूरनला १७० धावसंख्या असताना बाद केले. पूरनने ५२ चेंडूंवर ४२ धावा केल्या. चेजने १८ धावांचे योगदान दिले. एका धावेनंतर रवींद्र जडेजाने कार्लोस ब्रॅथवेटला (०) तंबूत धाडले. दोन धावांनंतर भुवनेश्वरने केमार रोचला बाद केले. मोहम्मद शमीने शेल्डन कॉटरेल (१७) आणि ओशाने थॉमसला (०) बाद करत भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार जेसन होल्डरने नाबाद १३ धावा केल्या.

भारताची वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात