नवी दिल्लीः अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदी येण्याचे मोठे संकेत दिले आहेत. मार्गन स्टेनली या बँकेच्या मते, जगभरातल्या अर्थव्यवस्था मंदीच्या मोठ्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे लवकरच जागतिक मंदी येण्याची चिन्हे आहेत. पुढच्या ९ महिन्यात ही मंदी येणार असल्याचीही शक्यताही मॉर्गन स्टेनली या बँकेनं वर्तवली आहे. भारतात आधीच नोटबंदीचे दुष्परिणाम झेलणारी अर्थव्यवस्था अजूनच हलाकीची होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम हा बेरोजगारी वाढण्यावर होणार आहे.
जगभरातल्या २ मोठ्या अर्थव्यवस्था या मंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेच मंदी येण्याचं प्रमुख कारण मानलं जातं आहे. जर अमेरिकेनं पुन्हा एकदा व्यापार युद्धाला तोंड फोडलं आणि चीनला आयात करणाऱ्या सर्वच वस्तूंवर २५ टक्के जास्त कर द्यावा लागल्यास जगभरात मंदीचे ढग दाटू शकतात. बाँड यील्डच्या ग्राफचं चक्र जेव्हा उलटं फिरू लागलं होतं, तेव्हाही २००८ साली आर्थिक संकट ओढावलं होतं. मात्र भारतात मंदी येण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही.
दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या ३ महिन्यांमध्ये घसरण झाली असून, देशाचा विकासही मंदावला आहे. औद्योगिक उत्पादन आणि कोअर इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. सध्या देशभरातील आर्थिक मंदीचा फटका खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यात वाढत्या आधुनिकीकरणाची भर पडल्याने बेरोजगारीचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. नोटबंदीनंतर देशातील अनेक उद्योग बंद पडले असून, त्याचा थेट फटका हा रोजगारावर पडला आहे. त्यामुळे देशातील बेरोजगारीचा प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
बांधकाम क्षेत्र, ऑटो क्षेत्रातर ग्राहक आणि मागणी शिवाय अक्षरशः रडकुंडीला आले आहेत आणि परिणामी या क्षेत्रातील रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर घटाला आहे. सरकारी क्षेत्रातील कंपन्यांची देखील अत्यंत वाईट आर्थिक परिस्थिती असून, सरकारी उद्योग देखील शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यात केंद्र सरकार या उद्योगांना वाचण्यापेक्षा संपवण्यासाठीच काम करत असल्याचा आरोप कामगार वर्गाने केला आहे. एका बाजूला खाजगी आणि सार्वजनिक उपक्रमातील उद्योगांची ही अवस्था असताना दुसऱ्या बाजूला यातून भारताचे लष्कर देखील सुटणार नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लवकरच येऊ घातलेल्या जागतिक मंदीमुळे भारतात अजूनच बिकट परिस्थिती होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, जागतिक मंदी येणार असल्यानं जागतिक बँकेनंही आतापासून उपाययोजनांची सुरुवात केली आहे.
