मुंबई: आरेमधील मेट्रो ३च्या कारशेडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यापासूनच जाहीर विरोध केला आहे. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील २ वर्षांपूर्वी आरेच्या दौऱ्यावर जाऊन तेथील दुर्मिळ प्राणी तसेच जीव जंतूंचं महत्व पत्रकार परिषेदत दाखवलं होतं. इतकंच नाही तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे थेट आरे पर्यंत पसरल्याने बिबटे आणि इतर दुर्मिळ प्राणी थेट आरे’मध्ये देखील ये जा करत असतात याचे दाखले दिले होते.

विशेष म्हणजे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते आरे असं विस्तीर्ण पसरलेलं हे जंगल म्हणजे मुंबईच फुफ्फुस असल्याचं अनेक पर्यावरणवाद्यांनी देखील जाहीर सांगितलेलं असताना मेट्रो प्रकल्पाची जवाबदारी हाताळणाऱ्या सरकारी अधिकारी अश्विनी भिडे या पहिल्यापासून अजब दावे करत आल्या आहेत. त्यांच्या एकूण उत्तरांमध्ये त्या दुर्मिळ प्राण्यांना काहीच किंमत नसते हे अनेकदा न बोलताच समोर आलं आहे. सध्या त्यांचं एकूण बोलणं म्हणजे केवळ शहरातील पायाभूत सुविधांच्याबाबतीत स्वतःच्या नावावर एखादा विक्रम कोरण्यासाठी असलेली धडपड म्हणावी लागेल, ज्यामध्ये निसर्ग आणि दुर्मिळ प्राण्यांची किंमत शून्य झाली आहे.

अनेक पर्यावरण प्रेमींनी तसेच स्थानिकांनी वारंवार त्यांना समजावून देखील त्यांनी न्यायालयाच्या आडून अनेक गोष्टी पुढे रेटल्या आहेत. दरम्यान यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. आरेमध्ये कारशेड उभारल्याशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊच शकणार नाही, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केला होता. परंतुहा दावा तर्कशुद्ध वाटत नसल्याचं मनसेने नेते अनिल शिदोरे यांनी म्हटलं आहे. यानंतर आता मेट्रोच्या कारशेडवरुन मनसे विरुद्ध अश्विनी भिडे असा ट्विटर संघर्ष सुरू झाला आहे.

मेट्रोच्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी शिवसेना, मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर भाष्य करताना अश्विनी भिडे यांनी आरेतील जागेची अपरिहार्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. कारशेड म्हणजे केवळ मेट्रो गाड्यांच्या पार्किंगची जागा नाही. ही स्वयंचलित यंत्रणा आहे. या प्रक्रियेसाठी कारशेड हे मेट्रोचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे. हे केंद्र १० किलोमीटर लांब जाऊन चालणार नाही, असं मत अश्विनी भिडेंनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.

अश्विनी भिडेंनी केलेल्या युक्तिवादावर मनसे नेते अनिल शिदोरेंनी ट्विटरवरून निशाणा साधला. ‘अडीच हजार झाडं तोडल्याशिवाय मेट्रो प्रकल्प होऊच शकत नाही हे तुमचं म्हणणं तर्कशुद्ध वाटत नाही. मूळ प्रकल्पाच्या संकल्पनेतच गफलत आहे. कमीत कमी झाडं तोडली जातील या विचारानं तुम्ही प्रकल्प आखलेला नाही. आधी प्रकल्प आखला आणि नंतर झाडं कशी वाचणार असं पहाता आहात,’ अशा शब्दांमध्ये शिदोरेंनी भिडेंना उत्तर दिलं.

मनसेच्या टीकेला अश्विनी भिडेंनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझं म्हणणं जर तर्कशुद्ध नसेल, तर मुंबईत वेगवेगळ्या गृहप्रकल्पांसाठी व अन्य प्रकल्पांसाठी दिलेल्या वृक्षतोड परवानग्यादेखील तर्कशुद्ध नव्हत्या, हेही ठासून सांगायला हवं होतं. किंबहुना आता एकही वृक्ष तोडायचा नाही. भले आवश्यक एकही प्रकल्प आणि गृहनिर्मिती झाली नाही तरी चालेल हीच भूमिका घ्यावी,’ असं भिडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अश्विनी भिडेंच्या प्रतिउत्तरात त्यांच्या तर्कशुद्ध बुद्धीची कीव करावी लागेल असं अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मुळात अश्विनी भिडे यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते आरे कॉलनीतील विस्तीर्ण असं पसरलेलं जंगल आणि त्यातील दुर्मिळ प्राणी यांचं महत्व आणि त्याच विस्तीर्ण जंगलाचा तर्क मुंबईतील इतर गृहप्रकल्पसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीशी करणे म्हणजे हास्यापास म्हणावे लागेल.

अश्विनी भिडेंनी आरेतील जंगलाचा तर्क इतर गृहप्रकल्पांशी जोडला; मनसे विरुद्ध ट्विट वॉर