मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चार-पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कामे मंजुरीचा सपाटाच लावला आहे. पाचशे कोटी रुपयांच्या दीडशे कामांना सोमवारी मंजुरी देणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी आणखी चारशे कोटींच्या ५० हून अधिक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये रस्ते, जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य काही प्रस्तावांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० कोटी रुपये कामांच्या तब्बल १५४ प्रस्तावांना मंजुरी दिली. स्थायी समितीची पुढील बैठक बुधवार, ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याची घोषणा सोमवारच्या बैठकीत करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. याच भीतीने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने दोन दिवसांत तब्बल १६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात २८४ प्रस्तावांचा समावेश आहे. स्थायी समितीने अर्थपूर्ण राजकारणातून कोटय़वधींचे प्रस्ताव मंजूर केले, पण ही कामे होणार का, कधी होणार, असा सवाल आता मुंबईकरांकडून उपस्थित होत आहे.
स्थायी समितीने सोमवारी सुमारे ५०० कोटींचे तब्बल १५४ प्रस्ताव सव्वा तासात मंजूर केले, तर बुधवारी १०१० कोटींचे प्रस्ताव अवघ्या १० मिनिटांत मंजूर केले. शौचालये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी वनखात्याला अधिदान देणे, रुग्णालयांसाठी विविध यंत्रांची व पुस्तकांची खरेदी आदी कामांचे कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले, तर सुका कचरा उचलण्याचे पाच कोटींचे कंत्राट, तर रस्त्यांचे प्रस्ताव असे १ हजार १० कोटींचे प्रस्ताव फक्त १० मिनिटांत मंजूर करण्यात आले.
