पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात कुठल्याही परिस्थितीत होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाषण करतील.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक ठिकाणी परवानगी मागितली, मात्र पोलीस आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी राज ठाकरेंची सभा नातूबागेच्या जवळील मैदानात होणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. कसबा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पुण्यात होत आहे.

मनसेने कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. अशातच राज यांची सभा पुण्यात होणार असल्याचे त्याचा पक्षाच्या उमेदावारांना फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रत्यक्ष निवडणुकींमध्ये न लढता राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये त्यांनी डिजीटल माध्यमांची आणि प्रेझंटेशनची मदत घेत सभा घेऊन सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे यंदा विधानसभेला मनसे फॅक्टर निवडणुकीमध्ये काय कमाल करणार याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहेत.

उद्या पुण्यात राजगर्जना; नक्की काय बोलणार यावरून सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली