मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपला शपथनामा अर्थात जाहीरनामा सोमवारी मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला.या जाहीरनाम्यात शेतकरी, शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य अशा ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, अनिल गोटे, एकनाथ गायकवाड उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी १३१ जागा तर काँग्रेस आणि मित्र १५७ जागा लढणार आहे. लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे हे आघाडीकडून धुळे मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय याचबरोबर तरूण, महिला व ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आहे. याप्रसंगी जयंत पाटील यांनी सांगितले की, हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्यावतीने एक समिती तयार करण्यात आली होती.

यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणवर मेहनत घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुनगीकर यांनी देखील यामध्ये विशेष योगदान दिले आहे. आमच्या मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये विशेष सुचना केलेल्या आहेत.

महाआघाडी शपथनामा ठळक मुद्दे;

  1. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
  2. सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
  3. शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण
  4. उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शिक्षण कर्ज
  5. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा
  6. कामगारांना किमान 21 हजार वेतन
  7. स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ
  8. सर्व महापालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी
  9. 80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार
  10. ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देणार
  11. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव
  12. जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
  13. विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार
  14. निम अंतर्गत कामगारांना पूर्णवेळ कामगारांचा दर्जा देणार

विधानसभेसाठी आघाडीचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, बेरोजगारांना ५ हजार ‘बेरोजगारी भत्ता’