कणकवली : राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदारपणे कामाला लागले आहेत. त्यात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्याबाबत स्वतः आमदार नितेश राणे यांनीच भाष्य केलं आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ साली पराभव झालेल्या कुडाळ-मालवणमधूनच नारायण राणे पुन्हा निवडणूक लढणार आहेत अशी माहिती नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. नारायण राणे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पाठींब्याने राज्यसभेत खासदार आहेत. त्यामुळे २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नारायण राणे पुन्हा राज्यात येणार का अशी चर्चा रंगली होती. मात्र आता ते कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढणार असल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, २०१४ साली शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी राणे यांचा १०५०० मतांनी पराभव केला होता. मात्र त्यावेळी राणे कॉंग्रेसमध्ये होते. दरम्यान २०१४ साली मोदी लाट आणि निवडणुका स्वतंत्र लढवून देखील शिवसेनेला एनडीए’चे घटक पक्ष असल्याने फायदा झाला होता आणि नारायण राणे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान मागील ५ वर्षात चित्र पूर्णपणे पालटले असून शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यावर कोणताही विकास केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला असून ते आमदार झाल्यापासून इथला विकास देखील खुंटला असल्याचं स्थानिकांचं मत आहे. तसेच सध्या या मतदारसंघात स्वतः नारायण राणे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून स्थानिक स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यावर त्यांचा अधिक भर असल्याचं दिसतं.

नारायण राणे विधानसभा कुडाळ-मालवणमधून लढणार: आमदार नितेश राणे