मुंबई : तीन दिवसांपूर्वी कोकणातील चिपळूण येथे झालेल्या तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर त्यात शिवसेनेतील स्थानिक आमदारच कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चौकशीत बाहेर आलं होतं. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिकांसोबत केलेल्या वरवरच्या चर्चेअंती सर्व दोष खेकड्यांना दिला होता आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.
दरम्यान कोकणात एवढी मोठी घटना घडून देखील स्वतःला कोकणाचे नेते असल्याची बोंब करणारे मंत्री विनोद तावडे या ठिकाणी फिरकलेच नाहीत. एकीकडे सबंध कोकण दु:खात असताना कोकणपुत्र विनोद तावडे यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्यानाचे उद्घाटन करतात. अन् विनोद तावडे हे आपल्यातील असंवेनशीलतेचे प्रदर्शन घडवतात. विनोद तावडे हे कोकणपुत्र असूनही कोकणातील माणसांच्या जखमांवर मीठ चोळतात त्यांनी विरोधकांच्या सदर विषयाला अनुसरून केलेल्या उपहासात्मक आंदोलनाला स्टंट म्हणत स्वतःची असंवेदनशीलता स्पष्ट केली आहे.
