वणी: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी रोज सभा घेत ते सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीमध्ये झालेल्या प्रचार सभेत सरकारसह विरोधकांवरही टीका केली. पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती हल्ला राज ठाकरे यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभाराचा त्यांच्या पक्षालाही काही फायदा झाला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधी पक्ष का महत्त्वाचा आहे, हे उपस्थितांना पटवून दिले. महाराष्ट्राला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे. सगळेच सत्तेत बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळेच सत्ताधारी मंडळी वाटेल ते निर्णय घेत आहेत. लोकशाही व्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाची भूमिका विरोधी पक्षांचीच असते.
“सध्या महाराष्ट्राला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा तुमचा आवाज कोण मांडणार. सगळेच सत्तेत जाऊन बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. तुमचा आवाज उठवण्यासाठी मला विरोध पक्षाच्या भूमिकेतून जायचं आहे,” असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी द्यावी असं आवाहन जनतेला केलं आहे. “सत्तेच्या गुळाला सगळे डोंगळे चिकटत आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
सक्षम, निडर विरोधी आवाज नसलेलं सरकार कुणालाही जुमानत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राला सध्या एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे असं सांगताना विरोधी पक्ष कमकुवत असल्यानेच असे निर्णय घेतले जातात. बहुमत आल्यानतंर जे हवंय तेच केलं जातं असं सांगताना तरीही तीच माणसं पुन्हा सत्तेत येणार असतील तर वरवंटा तुमच्यावरही फिरणार आहे असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
