नवी दिल्ली: सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेनेच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसं जाणार, असं सांगून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. महाराष्ट्रात जाणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेला काँग्रेस-एनसीपी पाठिंबा देणार ? या प्रश्नावर त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झालेली नाही. त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनणार या चर्चेलाही पवारांनी पूर्णविराम दिला. आपण मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची आहे.

यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही भाष्य केले.”शिवसेना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सरकार स्थापन करण्याबाबत किंवा पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेने अद्याप विचारणा केलेली नाही. आम्हीही कुणाशी संवाद साधलेला नाही. तसेच कुणाशी बैठकही घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, मी सोनियांना महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या अस्थिरता आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळी चर्चा केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला किंवा आम्ही त्यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी वातावरण आहे. शिवसेनेने १७० चा नंबर कुठून आणला ते माहित नाही. आमच्याकडे सत्ता बनविण्यासाठी संख्याबळ नाही. संजय राऊत आमच्याकडे १७०चं सख्याबळ असल्याचं सांगत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले त्यांच्याबरोबर बरोबरभारतीय जनता पक्षाचा मोठा गट असावा. मुंबईत मंगळवारी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सोनियांशी भेटणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार आहे.

भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही: शरद पवार