सोलापूर: सत्तास्थापनेच्या प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे संपले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आमची चर्चा होणार असून त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल. शुक्रवार संध्याकाळपर्यंत सत्तेचा फॉर्म्युलाही तयार होणार असून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेची अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबाबत आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याचे संकेतही त्यांनी दिले.
बुधवारी एनसीपी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेशी हातमिळवणी, सरकारमधील सहभाग आदी विषयांवर चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अहमद पटेल, वेणुगोपाळ, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित होते. एकूणच राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चाचा सपाटा सुरू होता, पण त्यातून निष्पन्न काय झाले हे स्पष्ट झाले नव्हते.
एकाबाजूला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेची तयारी जवळपास स्पष्ट झाली असली तरी भारतीय जनता पक्षातील नेत्यांची अजून मोठी अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोनही पक्ष हिंदुत्ववादी आहेत आणि हिदुत्वाच्या आधारावरच या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करण्याचा डाव आखत आहेत़. मात्र राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही असा विश्वास माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़.
