हिंगणघाट: हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

दरम्यान, पीडितेचा संघर्ष अखेर थाबंला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला.

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या ७ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला ७ फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला.

 

Web Title:  Hinganghat burnt case tension in Daroda Hinganghat after death of victim.

हिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार