अमेरिका : अमेरिकेत यूट्युबदेखील अडचणीत आले आहे. आधीच केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा चोरी प्रकरणामुळे फेसबुकवर टीकेची झोड उठली असताना आता यूट्युब सुद्धा १३ वर्ष पर्यंतच्या मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करून बालसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप अनेक संस्थांनी यूट्युबवर केला आहे.
अमेरिका स्थित तब्बल २३ संस्थांनी यूट्युबविरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रार दाखल केली असल्याने अमेरिकेत खळबळ माजली आहे. यूट्युबवर व्हिडीओ पाहणाऱ्या १३ वर्षाखालील लहान मुलांची माहिती ‘यूट्युबवर’ म्हणजे गुगलकडून गोळा केली जाते. या माहितीत फोन क्रंमांक, मुलांचे लोकेशन आणि डिव्हाईसची माहिती गुगलकडून गोळा केली जात असून त्यांचा आधार घेऊन त्यांना इतर संकेतस्थळांवर ट्रॅक केले जाते तसेच अशा प्रकारची माहिती गोळा करताना मुलांच्या वयानुसार पालकांकडून परवानगीदेखील घेतली जात नाही असं या संस्थांचं म्हणणं आहे.
त्यामुळे गुगल कंपनीकडून अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारदार संस्थांचे म्हणणे आहे. या २३ संस्थांमध्ये अमेरिकेतील कॅम्पेन फॉर कमर्शियल-फ्री चाईल्डहूड आणि सेंटर फॉर डिजिटल डेमोक्रसी अशा महत्वाच्या संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे गुगल कंपनीकडून अमेरिकेतील चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन होत असल्याने अमेरिकेत यूट्युबविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. ग्राहक डेटा चोरीत फेसबुक आणि यूट्यूब सारख्या दोन बलाढ्य कंपन्या अडकल्यामुळे खळबळ माजली आहे.
