नवी दिल्ली : भारताच्या राजकारणातील ७ प्रमुख पक्षांपैकी भाजप सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे २०१६-१७ च्या प्राप्तिकर विवरणपत्रात दिसून येते आहे. तर काँग्रेसचं उत्पन्न घटून खर्च अधिक झाला आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफॉर्म्स (एडीआर) ने प्रसिद्ध केलेल्या राजकीय पक्षांच्या विवरणपत्रांचे विश्लेषण केले आहे. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने तब्बल १,०३४.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले. तसेच भारतातील ७ प्रमुख पक्षांच्या विवरणपत्रांचे विश्लेषण केल्यास असे समोर येते की, त्यात एकट्या भाजपाचा वाटा ६६.३४ टक्के आहे. एडीआरने मंगळवारी ही यादी प्रसिद्ध केली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून काँग्रेसला गेल्या वर्षी एकूण २२५.३६ कोटींचे उत्पन्न मिळाले तर खर्च ३२१ कोटी केला. भाजपने ३१ टक्के, बसपा ७० टक्के आणि भारतीय कम्युन्स्टि पक्षाचे ६ टक्के उत्पन्न वर्षअखेर खर्च न होता शिल्लक राहिले असं हा अहवाल सांगतो.
एकूण ७ पक्षांनी मिळून १,५५९.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न आणि १,२२८ कोटी रुपयांचा खर्च केला असं अहवालात नमूद आहे. सर्वात धक्कदायक म्हणजे आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी भाजपाचे उत्पन्न थेट ८१ टक्क्याने वाढून ४६४ कोटी रुपये झालं आहे. बसपाचे उत्पन्न २१६ कोटी रुपयांनी २६६ टक्के तर एनसीपीचे उत्पन्न सुमारे नऊ कोटी रुपयांनी ८८ टक्के इतके वाढले. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्पन्न मात्र ३६ कोटी रुपयांनी १४ टक्क्याने घटले. अशीच घट तृणमूल काँग्रेस ८१ टक्के आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ६ टक्के उत्पन्नातही दिसून आली.
राजकीय पक्षांनी त्यांचा लेखा परीक्षण केलेला ताळेबंद निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची अखेरची मुदत ३० आॅक्टोबर २०१७ ही होती. भाजपाने ९९ दिवस तर काँग्रेसने १३८ दिवस विलंबाने हिशेब सादर केले. सात प्रमुख पक्षांपैकी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे चार पक्ष गेली सलग पाच वर्षे विलंबाने हिशेब सादर करत आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. भाजपाला सर्वाधिक ९९७ कोटी रुपयांचे उत्पन्न (९६ टक्के) ऐच्छिक देणग्यांमधून मिळाले. पक्षाने यापैकी सर्वाधिक ६०६ कोटी रुपये प्रचारावर खर्च केले तर प्रशासकीय कामांवर ६९.७८ कोटी रुपयांचा कर्च केला.
