मुंबई : राज्यातील सर्वच पक्षातील आमदार सभागृहात भले एकमेकांची उणीधुणी काढू देत, परंतु आमदारांच्या वेतन वाढीवर लगेच एकी दाखवून एकमताने पाठिंबा देताना तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील. त्यामुळे माहितीच्या अधिकारात ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांना देण्यात आलेले आकडे धक्कादायक असून, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमधील उच्च पदावरील अधिकाऱ्याला सुद्धा असा पगार आणि सुविधा मिळत नाहीत असा हा आकडा आहे.
महाराष्ट्रातील आमदारांना महिन्याला मिळणार मूळ पगार हा ६७ हजार आहे. महागाईत जनता होरपळून निघाली असली तरी आमदारांना मिळणार महागाई भत्ता तब्बल ९१,१२० रुपये इतका आहे. तर दूरध्वनी खर्च म्हणून ८००० रुपये दिला जातो. आधुनिक काळातील व्हॉट्सअॅप आणि इमेल्स उपलब्ध असताना आमदारांना टपालासाठी १०,००० रुपये दिले जातात आणि संगणक चालकाच्या पगारासाठी १०,००० रुपये वेगळे दिले जातात.
विशेष म्हणजे यात इतर सोयी सुविधा वेगळ्याच असतात. त्यामुळे वाढत्या महागाईचा आमदारांना किती त्रास होतो ते देवालाच ठाऊक.
