मुंबई : राज्याचे महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा’ अशी घोषणा केली होती. त्याचाच संदर्भ घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे.
सध्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आलिशान गाडीला मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे फटका बसला असून, त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले होते. गुरुवारी मध्य रात्री ही घटना घडल्याचे समजते. परंतु राज्यभर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला हा रोजचा अनुभव असतो. पण हाच अनुभव केंद्रात तसेच राज्यात सत्तेत असलेल्या नेत्यांना आल्याने विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.
त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी लगेचच ट्विट करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला आहे. ‘पाहा राज्यातील रस्त्यांची अवस्था कशी झाली आहे. खड्डा दाखवा अन् बक्षीस मिळवा योजनेतील १,००० रुपये आता मित्रपक्ष शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पाठवा’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.
आदरणीय @ChDadaPatil हे पहा…. राज्यातल्या सर्वच रस्त्यांची कशी अवस्था झाली आहे. खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतले हजार रुपये आता मित्रपक्ष @ShivSena आणि @AUThackeray यांना पण पाठवा. सरकारचे आता तरी डोळे उघडू द्या. @abpmajhatv https://t.co/nzEV4mF350
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 24, 2018
