मुंबई : जिओ कंपनीच्या केबल क्षेत्रातील प्रवेशाने केबल मालक धास्तावले असून त्यांनी मदतीसाठी राजकारण्यांकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच स्थानिक केबल मालकांना बाजूला सारून थेट ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याची ‘जिओ’ने योजना आखली आहे.

‘जिओ’च्या धडाकेबाज निर्णयाने स्थानिक केबल मालक धास्तावले असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येऊ शकते अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. त्यानिमित्त आज शिवसेनेने मुंबईमध्ये केबल व्यवसायिकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिओ’च्या नीतीवर सडकून टीका केली.

त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘केवळ डिजीटल इंडियाने लोकांची पोटं भरणार नाहीत. एवढंच असेल तर इंटरनेटसोबत रेशन आणि जीवनावश्यक वस्तू मोफत द्या, असा उपरोधिक टोला लगावला. इंटरनेट सारख्या सेवा पहिल्यांदा फुकट द्यायच्या, नंतर काही महिन्यांत प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन संपले की नंतर सेवादर वाढवायचे. जर मोफत द्यायचेच असेल तर ५० वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. शिवसेना नेहमी केबलचालकांच्या पाठीशी उभी राहणार. भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजीटलने पोट कसे काय भरेल? कोणीही व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, त्यामुळे इतरांच्या पोटावर पाय येऊ नये, हीच नाहक अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Shivsena chief Udhav Thackeray criticised Jio policies on free internet and Jio Cable service