पुलवामा : काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. CRPF च्या माहितीनुसार, रस्त्यावर एका ४ चाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा देखील खंडित करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपला पाटणा दौरा रद्द केला असून ते आज जम्मू काश्मीरमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला आणि जैश-ए-मोहम्मदला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
