नवी दिल्ली : चार दिवसांपूर्वी पुलवामामध्ये दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून देखील सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाही.
आज पहाटेपासून सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश- ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना ठार केले आहे. यात ‘जैश’चा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताबाबत सुरक्षा दलांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार परिसरात भारतीय जवानांनी जोरदार शोधमोहीम सुरु केली आहे. दरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अंधाधुंद गोळीबार केला. यानंतर सुरु झालेली चकमक सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सुरु होती. सुरक्षा दलांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते ते घर स्फोटकांनी उडवल्याचे समजते. या घरात लपून बसलेल्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे वृत्त आहे.
मृत दहशतवाद्यांमध्ये जैश- ए- मोहम्मदचा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याचे समजते. कामरान हा पाकिस्तानचा नागरिक असून तो जैशचा कमांडर होता. या हल्ल्यात मृत्यू झालेला दुसरा दहशतवादी हा पुलवामा येथील CRPFच्या ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरामाइंड अब्दुल गाझी असल्याचे समजते. गाझी हा मसूद अझहरचा निकटवर्तीय आहे. परंतु, सदर वृत्ताला सुरक्षा दलांच्या अधिकृत प्रतिनिधींनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.
