नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी आज होणार आहे. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली आहे. याबाबतचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.
दरम्यान, सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे आणि चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणारा काही सूर त्यातून निघाल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधक पुन्हा रान उठवतील आणि त्याचा थेट फटका निवडणुकीच्या मतदानातून उमटू शकतो असं सत्ताधाऱ्यांना वाटत असावं, अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
