श्रीनगर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काश्मीरमुद्द्यावरून युटर्न घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानला यावरून खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याबाबत सांगितलं होतं. त्यावेळी राहुल गांधीच्या वक्तव्याचा आधार घेत पाकिस्तानने त्यांची बाजू मांडली होती. दरम्यान, आता राहुल गांधींनी पाकिस्तानला काश्मीर प्रकरणात नाक खुपसण्याचा अधिकार नाही असं म्हटलं आहे.

‘जम्मू-काश्मीरमध्ये विविध सरकारी खात्यांतील ५० हजार जागा रिक्त असून, या जागा लवकरच भरण्यात येतील,’ अशी घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे. मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील कलम ३७० नुकतेच हटविण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बुधवारी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे. जेव्हा संसदेमध्ये त्यांच्या पक्षाचा नेता काश्मीरच्या मुद्द्याला संयुक्त राष्ट्रांशी जोडून बोलत होता, तेव्हाच राहुल गांधींनी बोलायला हवे होते. त्याचवेळी त्यांनी त्या नेत्याला थांबवून सांगायला पाहिजे होते की, आमची काश्मीरबाबत ही भूमिका आहे. काँग्रेसने आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. याचबरोबर, ज्यावेळी देशात निवडणुका येतील. त्यावेळी या नेत्यांच्या विरोधकांना काहीही बोलण्याची गरज नाही. जर ते म्हणतील हे (विरोधी नेते) कलम 370 चे समर्थक आहेत, तर लोक त्यांना बुटाने मारतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, केंद्रातील भाजप प्रणित सरकारने काश्मीरमधील मतभेदाचे आवाज दडपून टाकण्यासाठी क्रूरपणे बळाचा वापर केला असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ‘केंद्र सरकार एकतर विरोधी पक्षांना धमकावित आहे किंवा त्यांना पैसे टाकून विकत घेत आहे. आम्ही त्यांच्या धोरणांना व फुटीरतेच्या राजकारणाला विरोध करतो म्हणू केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारच्या हात धुवून पाठीमागे लागले आहे.’ असा आरोप त्यांनी केला.

….अन्यथा लोकं त्यांना बुटाने मारतील: जम्मू काश्मीरचे राज्यपाल