नवी दिल्ली: अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व ६७ एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर निर्माणाबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माझ्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, श्रीराम जन्मस्थळावर भव्य आणि दिव्य असे राम मंदिर उभारण्याबाबत एक विशाल योजना तयार केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एका स्वायत्त ट्रस्ट असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची स्थापन करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन : उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

 

Web Title:  PM Narendra Modi announces constitution of Shri Ram Temple Trust.

अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा