मुंबई: आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या टि्वटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर २०१९ हे वर्ष ‘लोकसभा इलेक्शन २०१९’ या हॅशटॅगने गाजवले, तर सर्वाधिक लोक्रप्रिय १० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले. त्या खालोखाल राहुल गांधी यांना पसंती मिळाली आहे.

लोकसभा निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे टि्वट या वर्षाचे ‘गोल्डन ट्विट’ ठरले आहे. या ट्विटला एक लाख १७ हजार १०० रीटि्वट, तर तब्बल चार लाख २० हजार लाइक्स मिळाले.

तत्पूर्वी, २०१८ मध्ये ट्विटरने त्यांच्या एकूण अकाउंट्सच ऑडिट प्रसिद्ध केलं होतं. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स असल्याचे समोर आले होते. ट्विटर ने अधिकृतपणे केलेल्या या ऑडिट’मध्ये फेक फॉलोअर्सचा छडा लावण्यात आला होता. त्यानुसार जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव येत असलं तरी त्यांच्या फेक फॉलोअर्सचा आकडा सर्वानाच धक्कादायक होता. मोदींच्या एकूण ४ कोटी फॉलोअर्स पैकी ६० टक्के म्हणजे चक्क २ कोटी ४० लाख मोदी फॉलोअर्स हे फेक अकाउंट्स म्हणजे फेक फॉलोअर्स असल्याचं स्वतः ट्विटरने म्हटलं होतं.

त्याआधी टाईम्स मॅगझीनच्या यादीत झळकलेले नरेंद्र मोदी ट्विटरने अधिकृतपणे जाहीर केलेल्या यादीमुळे मोदी हे जगात खरंच प्रसिद्ध आहेत का या बद्दल देशभरात संभ्रम निर्माण झाला होता. फेक फॉलोअर्सच्या यादीत मोदींच्या पाठोपाठ पोप फ्रान्सिस यांचं नाव असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चौथ्या स्थानी होते, त्यांच्या फेक फॉलोअर्सची टक्केवारी ही ३७ टक्के इतकी म्हणजे नरेंद्र मोदींच्या एकूण फेक फॉलोअर्सच्या जवळजवळ निम्मी होती.

मोदींच्या कोणत्याही ट्विटला होकारात्मक प्रतिक्रिया देणे, त्यांच्या ट्विटला लाईक्स देणे अशा उद्देशानेच असे फेक अकाउंट्स बनवले जात आहेत जेणेकरून जनमानसात त्यांच्या बद्दलची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि त्याच्या बाजूने एक मतप्रवाह निर्माण करण्यासाठी असे फेक ट्विट फॉलोअर्स त्यांचे अकाउंट्स वापरतात का अशी शंका निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशा फेक फॉलोअर्सचा निवडणुकीच्या काळात किंवा निकाल लागण्यानंतर सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि त्याचाच प्रत्यय या “गोल्डन ट्विट’मध्ये आल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

 

PM Narendra Modi Twitter Trending top Hashtags in India Declared Golden Twit

ट्विटरनुसार २०१८ मध्ये मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स; २०१९ मध्ये हे ‘गोल्डन ट्विट’ ठरलं