मुंबई: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या राफेल विमानाची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये पूजा केली. राजनाथ यांनी विमानावर ओम काढला आणि त्याच्या चाकाखाली लिंबूदेखील ठेवला. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी राजनाथ यांच्यावर जोरदार टीका केली. तर काहींनी त्यात काय चुकलं, यावरुन इतका गहजब करण्याचं कारण काय, असे प्रश्नदेखील उपस्थित केले.

राफेलच्या चाकाखाली ठेवलेल्या लिंबांमुळे राजनाथ सोशल मीडियावर ट्रोल झाले. परदेशात जाऊन राजनाथ यांनी केलेल्या कृतीमुळे भारताबद्दल नेमका काय संदेश जगभरात गेला, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. लिंबू ठेवण्यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे, असा सवाल सोशल मीडियानं विचारला. मात्र असं याआधाही घडलंय. दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्राची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे, असा प्रतिवाद काही जणांकडून करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०१७ रोजी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइन मार्गिकेचे उद्घाटन केले होते. या उद्घाटन प्रसंगी मोदींने अंधश्रद्धेवरुन विरोधीपक्षाच्या नेत्यांना टोला लगावला होता. ‘जुन्या विचारांमध्ये कैद असलेला कोणताही समाज प्रगती करु शकत नाही. आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. श्रद्धेला नक्की स्थान असावे पण अंधश्रद्धेला थारा देऊ नये. अंधश्रद्धेचा विषय हा केवळ उत्तर प्रदेशमध्ये आहे असं नाही. देशात अनेक राज्य आणि जागा अशा आहेत जिथे परंपरेच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जातात. तुम्ही पाहिलं असेल की एका मुख्यमंत्र्याने गाडी घेतली. त्यावेळी त्यांना गाडीच्या रंगावरुन कोणीतरी काहीतरी सांगितले. त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांनी गाडीला लिंबू आणि मिरची लावली. ही खरोखर घडलेली आजच्या युगातील गोष्ट आहे,’ असं सांगताना मोदींना हसू आवरता आले नाही. ‘ही अशी लोकं देशाला काय प्रेरणा देणार?’ असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. ‘अशा अंधश्रद्धांमध्ये जगणारे लोकं सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना समाजाचे मोठे नुकसान करतात. अशा या जुन्या परंपरांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागातील मुख्यमंत्री आणि सरकारे अडकलेली आहेत,’ असा टोलाही मोदींनी या भाषणात लगावला होता.

मात्र मोदींच्या त्याच भाषणामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे. आता मोदींचा हाच व्हिडिओ फेसबुक, ट्विटवर प्रंचड व्हायरल झाला आहे. अनेकांनी मोदींच्या मताशी सहमती दर्शवत लिंबू मिरची लावणे ही अंधश्रद्धा असून त्याचा धर्माशी संबंध नसल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी हाच व्हिडिओ वापरुन भाजपावर टीका केली आहे.

VIDEO: ‘लिंबू-मिरची लावणारे देशाला काय प्रेरणा देणार: नरेंद्र मोदी