नवी दिल्ली : एखाद्या सामाजिक विषयावर भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार काय सल्ला देतील याचा नेम नाही. देशभरात सध्या प्लास्टिकचा वापर प्लास्टिक बंदीवरून मोठं राजकारण याआधीच पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदार मीनाक्षी लेखी यांनी सामान्यांना अजब सल्ला दिला आहे.

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पाणी पिण्यासाठी यापुढे पेल्याचा वापर न करता, ओंजळीने पाणी प्या. तसेच दात घासण्यासाठी प्लास्टिकच्या ब्रशचा वापर टाळून ‘दातून’ वापरा, असे हास्यास्पद उपाय भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुचवले आहेत. गुरुवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

उपस्थितांना संबोधित करताना भाजप खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, “मुळात आपल्याला पेल्यात आणि बाटल्यांची गरजच काय? जेव्हा आपण शाळेत होतो, तेव्हा आपण आपल्या हाताने पाणी प्यायचो. मला वाटतं की ही सर्वात स्वच्छ पद्धत आहे. कारण या प्रक्रियेत तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुता आणि पेला धुण्यासाठी पुन्हा पाणी देखील वाया जात नाही.”

पूर्वी जेव्हा भाजीवाला यायचा तेव्हा सर्वसामान्य लोकं वेताच्या टोपलीचा वापर करताना दिसायचे. त्यावेळी कोणतंही प्लास्टिक उपलब्ध नव्हतं. त्यानंतर आपली दातून वापरण्याची सवय देखील पूर्णपणे सुटली. आता हे प्लास्टिकचे टूथब्रश कचाऱ्यात जातात आणि हा कचरा पुन्हा डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकला जातो. पर्यावरणपूरक बॅग आणि सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी जुन्या कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला देखील भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिला. दरम्यान, २०२२ पर्यंत एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर संपवण्याचं अभियान पंतप्रधान मोदी राबवत आहे. पंतप्रधान येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधीजींच्य जयंतीच्या निमित्ताने काही वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा करु शकतात.

ओंजळीने पाणी प्या; दात घासण्यासाठी ब्रश ऐवजी ‘दातून’ वापरा: भाजप खासदाराचा सल्ला