28 June 2022 11:21 AM
अँप डाउनलोड

हलगर्जीपणा सरकारचा आणि शिक्षा विद्यार्थ्यांना का : राज ठाकरे

मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा अर्थशास्त्र व दहावीचा गणिताचा पेपर फुटला त्याला केंद्र सरकार जवाबदार आहे. मग असं असताना सरकार स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत ? मुळात परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या हा सर्वस्वी सरकारचा दोष आहे त्याची शिक्षा विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी का भोगावी ?

देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी आपण असून त्यांनी फेरपरीक्षा देऊ नये असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या पत्रात म्हटलंय की, “सस्नेह जय महाराष्ट्र, सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?

माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.” असं या पत्रात म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या या आवाहनाला पालक कसा प्रतिसाद देतात व सरकार काय भूमिका घेतं हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

हॅशटॅग्स

#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x