रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देखील उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. मागील दोन दिवसातील सिंधुदुर्गमधील राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला पुन्हा तोंड फोडलं असून खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काल कणकवलीतील सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विखारी टीकेला खासदार नारायण राणे थेट उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रयात जाऊन प्रतिउत्तर देणार आहेत. दरम्यान विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती झाली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

मात्र मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे कुटुंबातील कटुता मुख्य कारण आहे. सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघात शिवसेनेनं उघडपणे सतीश सावंत यांना नीतेश राणे यांच्या विरोधात मैदानात उतरवलं आहे. तर, सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर शिवसेनेसमोर उभे ठाकलेत.

वांद्रयात जाऊन उद्धव ठाकरेंना उत्तर देणार: खासदार नारायण राणे